खेड : तालुक्यातील ऐनवली-कुडोशी येथील जगबुडी नदीवर वसलेला सुमारे ७० वर्षे जुना पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून, या पुलाचा वापर करणाऱ्या जवळपास ३० गावांमधील हजारो नागरिक आता भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. १९५७ मध्ये सुमारे ३० मीटर लांबीचा हा पूल बांधण्यात आला होता.
दगडी बांधकामावर आधारित आणि अत्यंत अरुंद असलेला हा पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर या पुलावरून पाणी वाहून गेले आणि त्यानंतर या पुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावू लागली. पुलाच्या पायालगतचे दगड मोठ्या प्रमाणात निसटले असून, पूल कमकुवत झाल्यामुळे तो कधीही कोसळू शकतो. पूल कोसळल्यास ऐनवली, कुडोशी, म्हाळुंगे, नांदीवली, हुंबरी, आंबवली, बरवली, चाटव, बिरमणी, कांदोशी यासह २५ ते ३० गावांचा संपर्क तुटेल.
या परिसरात दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण आणि कामासाठी जाणारे नागरिक यांच्यासमोर मोठा पेच उभा राहील, स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेलो नाही. आता परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, नागरिक दररोज जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकीकडे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, दुसरीकडे संपूर्ण परिसराची दळणवळण व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे.
पुलावर मोठ्या प्रमाणात तढे गेले आहेत. वाहने जाताना पूल हादरतो. भीती वाटते की, उद्या काही अनर्थ होईल. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे- ऋषिकेश मोरे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 20/Jun/2025














