रत्नागिरी : ‘एमबीबीएस’ जागांच्या नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह ?

रत्नागिरी : रत्नागिरीसह महाराष्ट्रातील ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मूल्यांकनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

याची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) गंभीर दखल घेण्यात आली आहे. एमबीबीएसच्या जागांबाबत बुधवारी (ता. १८) सुनावणी झाली. त्या वेळी रिक्त जागा लवकर भरण्याचे आणि विविध त्रुटी दूर करण्याचे आश्वासन महाविद्यालयाने दिले आहे.

‘एनएमसी’च्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकन केले होते. हे मूल्यांकन महाविद्यालयांनी सादर केलेली स्वप्रमाणित घोषणापत्र, आधारसक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीतील प्राध्यापकांची उपस्थिती, क्लिनिकल मापदंड आणि पायाभूत सुविधा यावर आधारित होते; मात्र ३० पैकी अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मापदंडांवर गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

निदर्शनास आणलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संस्थांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे निरीक्षणही ‘एनएमसी’ने नोंदवले आहे. तसे पत्र १३ जूनला सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यायाचा समावेश आहे.

विदर्भातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच डॉ. वैशंपायन मेमोरियल, सोलापूरसह बारामती, रत्नागिरी, आदीच्या एमबीबीएसच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांसदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून मूल्यांकन झाले होते. बुधवार (ता. १८) त्याची सुनावणी झाली. आम्ही याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर पदे भरण्यासंदर्भात आणि त्रुटी दूर करण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची आपली बाजू मांडण्यात आली-जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 20/Jun/2025