रत्नागिरीत २१ ते ३० जून दरम्यान संस्कृत संभाषण शिबीर

रत्नागिरी : योगदिनापासून २१ ते ३० जूनपर्यंत रत्नागिरी संस्कृत भारतीतर्फे दोन ठिकाणी संस्कृत संभाषण शिबिरांचे आयोजन केले आहे. दहा दिवस प्रतिदिन दोन तास जर संभाषण शिबिरासाठी दिले तर आपण व्यवहारामध्ये आवश्यक असलेले संस्कृत संभाषण शिकू शकतो, हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे.

शहरातील गुरुकृपा मंगल कार्यालयात संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत तसेच नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत इंदुलकर, राधाकृष्ण संकुल, शिवाजीनगर-आयटीआय जोडरस्ता (भाई वेडा दुकानाशेजारी), शिवाजीनगर येथे शिबिर होईल. पंधरा वर्षांवरील कोणीही या शिबिरात सहभागी होऊ शकतात.

शिबिराला येताना कोणतेही लेखन साहित्य आणण्याची गरज नाही. आम्ही कधीही संस्कृत शिकलो नाही, आम्हाला शाळेतही संस्कृत विषय नव्हता किंवा फक्त शाळेतच संस्कृत विषय होता असाही विचार मनात येऊ शकतो. या वयात कुठे संस्कृत शिकणार, असाही विचार काहींच्या मनात येतो; पण हे सहजशक्य आहे. व्यवहारातील आवश्यक संस्कृत संभाषण शिकण्याची संधी रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 20/Jun/2025