राजापूर : मुख्य रस्त्यावरील खड्डे १५ दिवसांत न भरल्यास उबाठा ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

राजापूर : सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चुन बनवण्यात आलेल्या राजापूर जकात नाका ते जवाहर चौक या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसांत भरले न गेल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा निर्वाणीचा इशारा राजापूर नगर पालिकेला देण्यात आला आहे. यासंदर्भात नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याकडे आज निवेदन देण्यात आले.

राजापूर जकात नाका ते जवाहर चौक रस्ता हा मार्च २०२३ मध्ये सुमारे १ कोटी ७० लाख रुपये खर्चुन तयार करण्यात आला होता; मात्र गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामध्ये या रस्त्याची वाताहात झाली असून, विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा शहरवासियांसह वाहन चालकांना खूप त्रास होत आहे. दररोज पडलेले खड्डे अधिकच रुंदावत असून त्यावरून ये-जा करणे अवघड बनले आहे, तर वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरील कसरत करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्याची दखल घेतली असून, आज राजापूर नगर पालिकेवर धडक देत निवेदन देण्यात आले. मुख्याधिकरी यांच्या अनुपस्थितीत पालिकेचे मुख्य सचिव जितेंद्र जाधव यांनी ते निवेदन स्वीकारले. खराब बनलेल्या रस्त्याची पंधरा दिवसांच्या आत दुरुस्ती न झाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा गर्भित इशारा यात देण्यात आला आहे.

पालिकेत निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, विनय गुरव, अनिल कुडाळी, सौ. वीणा विचारे, प्रतीक्षा मांजरेकर, संगीता चव्हाण, मीनाक्षी गुरव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 20/Jun/2025