रत्नागिरी : तिकिटावरचा ‘ट्रीप कोड’ मोबाइल अॅपमध्ये टाका; बसचा ठावठिकाणा कळणार

रत्नागिरी : प्रवाशांच्या गरजेनुसार राज्य परिवहन महामंडळाने काळानुरूप अनेक बदल स्वीकारले आहेत. महामंडळाने विकसित केलेल्या अॅपवर प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून ‘लालपरी’चा ठावठिकाणा कळणार आहे. एसटीच्या ताफ्यातील बसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस)’ बसविण्यात आली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना आवश्यक ती माहिती मिळणार आहे.

रेल्वेप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाने ‘जीपीएस’ यंत्रणा लागू केली असून, दि. १५ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात भाविकांना याचा चांगला फायदा होणार आहे. नवीन प्रणालीमुळे एसटीच्या महसूलात वाढ होण्याबरोबर प्रवाशांना चोख सेवा मिळण्यास मिळण्यास मदत होणार आहे. बस वेळेवर धावणे, प्रवास कालावधीवर नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना वेळेवर मदत मिळू शकणार आहे. प्रवाशांना मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत अॅप वापरता येणार आहे.

तिकिटावरील ‘ट्रीप कोड’ महत्त्वाचा ठरणार
प्रवाशांनी अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकीटावरील ट्रीप कोड टाकल्यास बसचे लोकेशन कळेल

प्रवास सुरक्षित होणार, वेळही वाचणार
लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कुठे आली, मधल्या थांब्यावर कधी येणार याची माहिती मिळत नाही. परंतु ‘व्हीटीएस’ च्या मदतीने बसचे थांबे, स्थानकात येण्याची वेळ याची माहिती मोबाइल अॅपवर उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास तर सुरक्षित होईल, शिवाय त्यांचा वेळही वाचणार आहे. अपघात झाल्यास यंत्रणांना फोन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

विभागात किती बसगाड्यांमध्ये जीपीएस ?
रत्नागिरी विभागातील ६८५ बसेसवर व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ही यंत्रणा लागू करण्यात आल्याने प्रवाशांचा याचा फायदा होणार आहे. बसचा शेवटचा थांबा, स्थानकात कधी येईल याची माहिती मिळणार आहे.

कोणते अॅप इन्स्टॉल करावे लागणार?
एसटी महामंडळाचे एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप असून याद्वारे तिकीट बुकींग, बसचे लोकेशन, आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्ले स्टोअर किंवा गुगलवरून हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते. आवश्यकतेनुसार प्रवाशी याचा वापर करू शकतात.

लालपरी गावात, स्थानकात कधी येईल, यासाठी प्रवाशांना वाट पाहावी लागते. वेळ माहिती नसल्याने प्रवाशांना काहीवेळा ताटकळत उभे राहावे लागते. मात्र, जीपीएस यंत्रणेद्वारे लवकरच प्रवाशांना लाइव्ह लोकेशन कळणार आहे- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 01/Jul/2025