खेड : ‘लोटे-चिरणी-आंबडस’ मार्गावर दोन जणांचा बळी

खेड : तालुक्यातील लोटे-चिरणी-आंबडस रस्त्यालगत असणारी झाडेझुडुपे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. या मार्गावर गत सहा महिन्यांत झालेल्या अपघातांत दोन बळी गेले आहेत. संबंधित ठेकेदार व पंतप्रधान ग्रामसडक कार्यालय याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

परशुराम घाटात अपघात अथवा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास पर्यायी रस्ता म्हणून चिरणी-लोटे-आंबडस रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता कळबंस्तेमार्गे चिपळूणकडे जाण्यासाठी सोयीचा ठरत आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारांनी दोन वर्षांपूर्वी पूर्ण केले असले तरी अजूनही साईटपट्ट्या व गटार व्यवस्था नाही. तसेच रस्त्यालगत झाडेझुडुपे असल्याने घाटात समोर येणारे वाहन न दिसल्यामुळे मोठे अपघात होत आहेत. माजी उपसभापती तसेच शिवसेना तालुकाप्रमुख मोहन आंब्रे यांना दुचाकी अपघातात प्राण गमवावा लागला. तसेच चार महिन्यांपूर्वी लोटे येथील घर बांधणारे ठेकेदार येळवी यांनाही प्राण गमावावा लागला होता. अनेक अपघात रस्त्यावर सातत्याने होत असूनही संबंधित ठेकेदार मात्र दुर्लक्ष करत आहेत. गटारव्यवस्था न केल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने साईटपट्ट्या खचल्या आहेत.

दरम्यान, या रस्त्यावर लोटे एमआयडीसीतील कामगारांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तसेच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती करून अपघात टाळावेत, अशी मागणी होत असून चिरणी, आंबडस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 02/Jul/2025