मंडणगड : सुटीचा आणि पर्यटनाचा हंगाम असूनही भारमान नसल्याने मंडणगड आगार मे महिन्यात १४ लाखांनी तोट्यात गेले आहे. ग्रामीण भागात पन्नास टक्केच भारमान मिळत असून, वाहतुकीचा खर्च अधिक झाला आहे. परिणामी, मंडणगड आगाराचे चाक कमी भारमानाच्या चिखलात रूतत आहे.
मंडणगड आगारप्रमुख एम. बी. जुनिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड आगारातून ४८ एसटी बसच्या १९७ फेऱ्या होतात. मे महिन्यात १४ हजार ५०० किमी प्रतिदिवस प्रवास होता. मात्र, सवलत मूल्यांसह ३८ टक्केच भारमान राहिले आहे. प्रतिकिलोमिटर खर्च ५७ रुपये अपेक्षित असल्यामुळे आगाराला तोटा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात इंधन आणि कर्मचारी असा ३८ रुपये प्रतिकिमी खर्च होत असताना तो १९ रुपये प्रतिकिमी भारमान राहत आहे. परिणामी, आगार हे कमी भारमानामुळे तोट्यात येत आहे.
मंडणगड तालुका डोंगराळ असून तालुक्यातील ग्रामस्थ नोकरी व्यवसायासाठी मुंबई, नालासोपारा, बोरिवली परिसरात वास्तव्यास आहेत. यांच्यासाठी एसटी हा प्रमुख प्रवासाचा पर्याय आहे. मंडणगड बसस्थानकातून सकाळी ६ वाजता सुटणारी मंडणगड मुंबई, ८.१५ वाजताची मंडणगड- बोरिवली, तसेच सायंकाळी ५ वाजताची मंडणगड-मुंबई या तिन्ही फेऱ्या बंद केल्या आहेत. या फेऱ्या बंद केल्या नसल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. मात्र, भारमनातून खर्च आणि अपेक्षित उत्पन्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले
वेळापत्रक पाळल्यास भारमान वाढेल
योग्य वेळापत्रक न पाळल्यामुळेच प्रवासी कमी मिळत आहेत. त्यामुळे कमी प्रवासी हे कारण देत बस बंद करण्याचे कारणच चुकीचे आहे. अनियमित वेळापत्रकामुळे मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, कामगार आणि वरिष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. यावर गांभीर्यपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 02/Jul/2025














