चिपळुणातील मच्छीमारांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे पंकजा मुंडेंकडून आश्वासन

चिपळूण : तालुक्यातील नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याच्या विषयावर आमदार शेखर निकम यांनी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला. त्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मच्छीमार आणि शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

चिपळूणमधील कामथे गावात एका कंपनीचे दूषित पाणी नदीत सोडताना टँकर आढळून आले होते. नागरिकांनी घेराव घालून दोन टँकर जप्त केले होते. त्यानंतर एमपीसीबीने त्या कंपनीला प्रकल्पात सुधारणा करण्याची नोटीस दिली. तेव्हापासून वाशिष्ठी आणि तालुक्यातील नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा प्रश्न गाजत आहे. कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे शेतीसह मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. त्यावर आमदार निकम यांनी कंपनीकडून शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी पर्यावरण विभाग बैठक घेणार का?’ असा प्रश्न विचारला त्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

विषयाकडे गांभिर्याने पाहू : मुंडे
नद्यांमध्ये अनधिकृतरीत्या रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या काही खासगी कंपन्या आणि टँकर माफियांविरोधात कारवाईची मागणी आमदार निकम यांनी केली. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयाकडे गांभिर्याने पाहू, असे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 02/Jul/2025

Arihant 2