रत्नागिरी जिल्ह्यात ७७७ क्षयरोग बाधित

रत्नागिरी : जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, गतवर्षी २०२४ ला जानेवारी ते मे या कालावधीत जिल्ह्यात क्षयरोग बाधितांची संख्या ९२२ होती. यंदा मेपर्यंत ही संख्या ७७७ झाली आहेत. २०१५ ला क्षय रुग्णांची संख्या वाढत होती. त्यांनतर क्षयरोग विभागामार्फत राबविलेल्या विशेष जनजागृती मोहिमेमुळे योग्य उपचार रुग्णांना मिळू लागले. परिणामी जिल्ह्यातील ३९ टक्के क्षय रुग्णांची संख्या कमी झाली.

भारत देश २०२५ अखेरपर्यंत टीबीमुक्त होईल, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यभरात क्षयरुग्णांसाठी जनजागृती विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायती, शहर, विविध तालुक्यात मागील वर्षी २ हजार ४०० रुग्णांचे उद्दिष्ट जिल्ह्याला होते. त्यापैकी वर्षभरात २ हजार १३६ इतके रुग्णांचे निदान झाले. ८९ क्के इतके उद्दिष्ट साध्य झाले. मागील वर्षी जानेवारी ते मे २०२४ ला जिल्ह्यात ९२२ क्षयरुग्ण आढळले होते, तर यंदा जानेवारी ते मे २०२५ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ७७७रुग्ण आढळले आहेत.

त्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात जुलैपासून होणाऱ्या मोहिमेत सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती, एकदा टीबी होऊन गेला, पुन्हा टीबी झाला. यासह विविध आजार, टीबीची सुरुवात अशा संशयितांची तापसणी करून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी पथक, आशा वर्करच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील क्षय रुग्णांना पोषण आहारासाठी १ हजार रुपये देण्यात येतात. काहींना चांगला आहार मिळतो. उर्वरित रुग्णांसाठी पोषण आहार मिळावे म्हणून जिल्ह्यातील दानशूर, संस्था संघटनांनी समोर येऊन मदत करावी, असे आवाहन क्षयरुग्ण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 02/Jul/2025