रत्नागिरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सफाई कामगाराला मारहाण; कर्मचाऱ्यांचा एल्गार, अखेर माफीनाम्यानंतर मिटले प्रकरण!

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते साजिद पावसकर यांनी रत्नागिरी नगरपालिकेचे सफाई मुकादम मनोहर काशिनाथ कदम यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजीवडा येथे घडलेल्या या घटनेमुळे सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते, मात्र पावसकर यांच्या लेखी माफीनाम्यानंतर हे प्रकरण निवळले आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.

मनोहर कदम यांनी साजिद पावसकर यांचा फोन उचलला नाही, या रागातून पावसकर यांनी कदम यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी तात्काळ काम बंद करून नगरपालिकेसमोर मोठ्या संख्येने एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला.

प्रकरण आपल्या अंगलट येत असल्याचे लक्षात येताच, साजिद पावसकर यांनी तातडीने लेखी माफीनामा दिला. पावसकर यांच्या माफीनाम्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि पुन्हा कामावर रुजू झाले.

सध्या रत्नागिरी नगरपालिकेचे कामकाज प्रशासकाच्या हाती आहे. या काळात राजकीय कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेचे कर्मचारी आणि विशेषतः सफाई कामगार यांच्यावर नेहमीच दमदाटी केली जात असल्याचे म्हटले जाते. आजच्या या घटनेने मात्र कळस गाठला आणि अखेर सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसावे लागले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:56 02-07-2025