रत्नागिरी : विशेष फेरीतील प्रवेशाचे अधिकार प्राचार्यांना द्या – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी

रत्नागिरी : यावर्षी मोठा गाजावाजा करून अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र या प्रक्रियेने अपेक्षित प्रवेश झालेच नाहीत. त्यामुळे विशेष फेरीतील प्रवेशाचे अधिकार प्राचार्यांना द्यावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.

याबाबतचे निवेदन आज रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी शिरभाते व प्रशासकीय अधिकारी परवीन तडवी यांना संघटनेचे सचिव प्रा. दिलीप जाधव, सदस्य प्रा. दत्तात्रय माळवदे यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत अनेक उणिवा राहिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये, ग्रामीण भागांतील उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये अपेक्षित प्रवेश झालेले नाहीत म्हणून विशेष फेरीत प्रवेशाचे अधिकार प्राचार्यांना मिळावेत.

यावर्षी दहावीचा निकाल १३ मे रोजी लागूनही अद्याप अकरावीचे प्रवेश व अध्यापन सुरू झालेले नाही. २९ जून ते २५ जुलैपर्यंत या संपूर्ण राज्यभराच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत महाविद्यालयाचा, पर्यायाने शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. समाधानकारक प्रवेशसंख्या पाठवण्यात आलेली नाही. तिसऱ्या फेरीत बोटावर मोजण्याएवढ्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. आर. पाटील आणि सचिव प्रा. दिलीप जाधव यांनी सांगितले.

नेटवर्कची समस्या
रत्नागिरी जिल्हा हा बहुतांशी डोंगराळ भागाचा असून, ऑनलाईन प्रवेशअर्ज वेळोवेळी अपडेट करण्यासाठी नेटवर्कची समस्या असल्याने पालकांना शहराकडे धाव घ्यावी लागते. नाहक आर्थिक बोजा सहन करावा लागतो. उशिरा प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल की, नाही याचीही चिंता सतावत आहे. आता महाविद्यालय, पालक, विद्यार्थी यांच्यामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागात अनुदानित वर्गाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ऑफलाइन प्रवेश झाले असते. २६ जूनला संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन अकरावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले असते, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 30/Jul/2025