मटण-मच्छी मार्केट इमारतीची डागडुजी ऑडिटप्रमाणे व्हावी : इनायत मुकादम

चिपळूण : चिपळूण नगर परिषद मालकीच्या २० वर्षे विनावापर असलेल्या मटण-मच्छी मार्केट इमारतीची डागडुजी सुरू झाली आहे. परंतु, हे काम प्रशासनाकडून वार्षिक दरपत्रक व रोजंदारीवर केले जात आहे; मात्र या इमारतीच्या ऑडिट अहवालानुसार हे काम होणे अत्यंत गरजेचे असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेले काम थांबवावे, अन्यथा घाईगडबडीने काम पूर्ण केल्यास ते तकलादू स्वरूपाचे व तात्पुरते राहणार आहे. भविष्यात त्याचे परिणामही दिसून येतील, अशा स्वरूपाचे पत्र माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी व न. प. मुख्याधिकारी यांना दिले आहे.

मुकादम यांनी याबाबत असे स्पष्ट केले आहे की, मटण व मच्छी मार्केटची इमारत बांधून विनावापर २० वर्षे उभी आहे. या कालावधीत इमारतीच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले. तसेच व्यावसायिकांनाही या ठिकाणी व्यवसाय करणे अशक्य होते. मध्यंतरात न. प. प्रशासनाकडून या इमारतीचा वापर व्हावा व व्यावसायिकांना जागा उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले व त्यामध्ये सूचविल्याप्रमाणे आवश्यक त्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

मात्र, सद्यस्थितीत सुरू असलेल्या दुरूस्ती कामावर मुकादम यांनी एका पत्राद्वारे आक्षेप घेतला आहे. प्रशासनाला दिलेल्या पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टप्रमाणे सूचविण्यात आलेली दुरुस्ती, मजबुती करून व त्या संदर्भातील उपाययोजना हे त्यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार करणे गरजेचे व बंधनकारक आहे. परंतु या ऑडिट रिपोर्टकडे दुर्लक्ष करून रोजंदारीवरील अकुशल कामगारांकडून डागडुजी व प्लॅस्टरचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी वार्षिक दरपत्रक व रोजंदारीवर हे काम केले जात आहे. हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.

दरम्यान, ही तकलादू व तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी व दुरुस्ती होत आहे. प्रत्यक्षात इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधील सर्व बाबींबाबत नमूद केलेल्या अहवालाचे पूर्णतः अवलोकन व त्याचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. त्याचे पालन न केल्यास सदरची इमारत वापरास योग्य आहे वा कसे ते ठरविणे अशक्य होईल.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 30/Jul/2025