रत्नागिरी : मिठाई तयार करताना फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्नपदार्थांच्या सेवनामुळे विषबाधेसारखी अनुचित घटना घडणार नाही, याची जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन येथील अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी केले आहे.
सणासुदीच्या कालावधीमध्ये मिठाई तसेच खवा, मावा, तूप, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती आदीची मागणी वाढते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. आस्थापनेचा परिसर कीटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक/नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावेत. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा. पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल प्राप्त करून घ्यावा. तयार अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नये.
मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (१०० PPM पेक्षा कमी). अन्नपदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकिंग करताना वर्तमानपत्राचा वापर करू नये. बंगाली मिठाई ही २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावे. मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॅप्रन वापरावा. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख उच्चप्रतीचा असावा.
मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. आस्थापनेत कार्यरत अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्याचा अभिलेखा ठेवावा. अन्न आस्थापनेत २५ कर्मचाऱ्यांच्या मागे १ असे ‘Fostac training’ प्राप्त ‘Food Safety Supervisor’ नियुक्त करावा, अशा सुचना सहायक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 14/Aug/2025












