दापोली: आंजर्ले येथील कोपरी परिसरात रविवारी (५ जुलै) कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत उभे असलेले एक विस्तीर्ण आंब्याचे झाड अचानक उन्मळून शेजारील घरावर कोसळले. या दुर्घटनेत निवासी घराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, अत्यंत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी भागातील रहिवासी शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्याशेजारी हे आंब्याचे भलेमोठे झाड उभे होते. सततच्या मुसळधार पावसामुळे झाडाची मुळे कमकुवत झाली आणि ते थेट शिंत्रे यांच्या पडक्या वाड्यावर तसेच शेजारी राहणारे रवी खंडकर यांच्या घरावर जाऊन कोसळले. या जोरदार आघातामुळे रवी खंडकर यांच्या घराचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
घरमालक मुंबईत असल्याने अनर्थ टळला
ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी खंडकर यांच्या घरात कोणीही उपस्थित नव्हते. मूळ घरमालक रवी खंडकर हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असल्याने आंजरले येथील घर बंद होते. झाड कोसळले त्या क्षणी घरात कोणीही नसल्यामुळे एका मोठ्या अपघातातून सर्व जण सुखरूप बचावले असून कोणतीही दुखापत झालेली नाही.
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
झाड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि प्रतिष्ठित नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आंजरले गावचे पोलीस पाटील जगदीश कळमकर, ग्रामपंचायत प्रशासक मेघना पवार, उदय बापट, मंगेष महाडीक, मकरंद म्हादलेकर, दत्ता जोशी, बाळ केळकर आणि दिगंबर निजसुरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या दुर्घटनेची अधिकृत माहिती स्थानिक तलाठ्यांना देण्यात आली असून, महसूल विभागामार्फत तत्परतेने पंचनामा करून बाधित कुटुंबाला शासकीय नियमांनुसार योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याची कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 06-07-2026














