महामार्गावर ‘यमदूता’चा पहारा; रखडलेल्या मुंबई-गोवा हायवेसाठी पत्रकारांचा एल्गार!

रत्नागिरी, दि. १६: गेली १७ वर्षे केवळ आश्वासनांच्या खड्ड्यांत अडकलेल्या आणि कोकणवासियांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आज अखेर पत्रकारांनीच रस्त्यावर उतरून शासनाला जागे केले. मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली निवळी येथे झालेल्या जोरदार आंदोलनात, ‘यमदूता’च्या प्रतीकात्मक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि महामार्गाच्या भीषण वास्तवाची दाहकता अधिकच तीव्रतेने मांडली.

शनिवारी सकाळी ११ वाजता, ‘महामार्गाचे खड्डे झाले खोल, अपूर्ण कामाचा सरकारवर बोल’ आणि ‘कोकणवासियांच्या जीवाशी खेळणे बंद करा, मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा’ अशा गगनभेदी घोषणांनी निवळीचा परिसर दणाणून गेला. रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गामुळे होणारे अपघात आणि नाहक जाणारे बळी याविरोधात पत्रकारांनी आपला संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे ‘यमदूता’च्या भूमिकेत सहभागी झालेला एक पत्रकार. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला थांबवून, “सावकाश जा, पुढे जीवघेणे खड्डे आहेत,” असा कळकळीचा सल्ला हा ‘यमदूत’ देत होता. रस्त्यावरील यमदूत आणि पत्रकारांचा हा संताप, शासनाच्या निष्क्रियतेवर केलेला एक थेट आणि सणसणीत प्रहार होता. या अनोख्या संकल्पनेमुळे महामार्गाची भयावह स्थिती अधिक प्रभावीपणे सर्वांसमोर आली.

आंदोलक पत्रकारांनी शासनाच्या आजवरच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अनेक सरकारे आली आणि गेली, सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले, पाहणी दौरे झाले, बैठका झाल्या. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दौरे करून आश्वासनं दिली. पण प्रत्येक वेळी कोकणच्या पदरी केवळ निराशाच आली आहे. दिलेल्या डेडलाईन कधीच पाळल्या गेल्या नाहीत. शासन आमच्या सहनशीलतेचा अंत आणखी किती काळ पाहणार आहे?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Samarth gold

पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवून आंदोलनाला सहकार्य केले, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता तरी सरकार या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करेल, अशी आशा कोकणवासीय व्यक्त करत आहेत.