मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; जाब विचारल्याने नाशिकच्या ५ जणांकडून चालकाला गुप्तभागावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण!

खेड (रत्नागिरी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव कारने पाठीमागून ठोकर दिल्यानंतर झालेल्या अपघाताच्या रागातून कारमधील ५ जणांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवला. या जमावाने अपघातग्रस्त गाडीच्या चालकाला पोटावर, तोंडावर आणि थेट गुप्तभागावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे.

कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी मध्यरात्री राडा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:०६ वाजण्याच्या सुमारास खेड येथील कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी, मुंबई-गोवा हायवेवर घडली. याप्रकरणी जखमी चालक शैलेश जयसिंग गुरव (वय ३६, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. आरवली, गुरववाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भरधाव कारने दिली पाठीमागून धडक

फिर्यादी शैलेश गुरव हे मध्यरात्री आपल्या ताब्यातील गाडी (क्र. MH-14/JL-5201) घेऊन गोवा-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात होते. ते कामाक्षी पेट्रोल पंपाच्या समोर आले असता, पाठीमागून येणाऱ्या कार (क्र. MH-48/AW-7093) वरील चालक सुमित विलास गांगुर्डे याने आपली गाडी भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि हयगयीने चालवून गुरव यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

नाशिकच्या पर्यटकांचा बेकायदेशीर जमाव अन् मारहाण

अपघात झाल्यानंतर कारमधील प्रवाशांनी शांत राहण्याऐवजी उलट अपघाताच्या रागातून बेकायदेशीर जमाव जमवला. या जमावाने फिर्यादी चालक शैलेश गुरव यांना घेरले आणि त्यांना पोटावर, तोंडावर तसेच त्यांच्या गुप्तअंगावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चालक शैलेश गुरव हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात आणि गदारोळात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिकच्या ५ जणांवर खेड पोलिसांत गुन्हा दाखल

या मारहाणप्रकरणी खेड पोलिसांनी १५ मे २०२६ रोजी सकाळी ६:३३ वाजता गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवासी असलेल्या ५ आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) सुमित विलास गांगुर्डे (आरोपी चालक) २) मीना विलास गांगुर्डे ३) अनिता भैरवनाथ अहिर ४) भैरवनाथ सुखदेव अहिर ५) सोमनाथ मास्ती अभंग (सर्व राहणार- सिन्नर, जि. नाशिक)

या सर्व आरोपींविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९० सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर अशा प्रकारे मारहाण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.