Farmers Protest in Mumbai: कोकणातील काजू-आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, विनायक राऊतांसह दिग्गज नेते ताब्यात

Farmers Protest in Mumbai:

गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाच्या दिशेने निघालेला हा मोर्चा पोलिसांनी मध्येच रोखला. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला, ज्यानंतर पोलिसांनी शेतकरी नेत्यांसह अनेक आंदोलकांची धरपकड केली.

राजू शेट्टींसह ‘या’ दिग्गज नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन थेट मागण्या मांडण्यावर आंदोलक ठाम होते. मात्र, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत आंदोलकांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची विनंती केली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या प्रमुख नेत्यांची नावे:

  • राजू शेट्टी (नेते, शेतकरी संघटना)
  • हर्षवर्धन सपकाळ (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)
  • जयंत पाटील (नेते, शेकाप)
  • विनायक राऊत (माजी खासदार, शिवसेना)

नेत्यांच्या या अटकेमुळे आंदोलन अधिकच पेटले असून, उपस्थित शेतकरी कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.


कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक का संतापले?

या वर्षी कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु, “सरकारने जाहीर केलेली २२ हजारांची ही मदत अत्यंत तुटपुंजी असून, याने शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत,” असा आरोप करत आंबा-काजू उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सरकारकडून भरीव आणि ठोस आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठीच कोकणातील शेतकऱ्यांनी मुंबईची वाट धरली होती.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न अपयशी

कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संपूर्ण समस्येवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काजू आणि आंबा उत्पादकांच्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सध्या मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण या शेतकरी आंदोलनामुळे चांगलंच तापलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 16-05-2026