Breaking : आंबा घाटात दरड कोसळली, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग ठप्प!

रत्नागिरी, १८ ऑगस्ट:

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, त्याचे गंभीर परिणाम आता वाहतुकीवर दिसू लागले आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळल्याने महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या महतीनुसार, रस्त्यावर मातीचा मोठा ढिगारा आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबा घाटातील दरडी भुसभुशीत झाल्या होत्या. आज सकाळी अचानक घाटातील मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला, ज्यामुळे वाहतूक पूर्णतः थांबली. कोल्हापूरकडे जाणारी आणि रत्नागिरीकडे येणारी, अशी दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून, शेकडो वाहने घाटात अडकून पडली आहेत.

पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने रस्त्यावर आणखी माती आणि मलबा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे, मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 18-08-2025