Marathi Bhasha Sangrahalaya Ratnagiri: रत्नागिरीत उभारणार राज्यातील पहिले मराठी भाषा संग्रहालय; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १ एकर जागा निश्चित, बोलीभाषांचे संशोधन अन् अभ्यासाला मिळणार बळ

रत्नागिरी :

Marathi Bhasha Sangrahalaya Ratnagiri अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरी शहरात उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठीतील लेखकांवर आणि साहित्यावर येथे सखोल संशोधन (रिसर्च) व्हावे, हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या संग्रहालयासाठी रत्नागिरी शहरात तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून १ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.

Marathi Bhasha Sangrahalaya Ratnagiri: सन्मित्र नगर येथे १ एकर जागेत उभी राहणार वास्तू

मराठी भाषेचा इतिहास, समृद्धी आणि तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे संग्रहालय राज्यासाठी एक महत्त्वाचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील सन्मित्र नगर या मध्यवर्ती ठिकाणी हे मराठी भाषा संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविध बोलीभाषांवर सखोल संशोधन केले जाईल. तसेच ज्या महनीय व्यक्तींनी आणि साहित्यिकांनी मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान दिले आहे, त्यांच्या साहित्यावर संशोधन आणि दुर्मिळ साहित्याचा संग्रह येथे केला जाणार आहे.

ज्ञानेश्वरीपासूनचा इतिहास अन् बोलीभाषांचा होणार अभ्यास

संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीपासून मराठीत साहित्य उपलब्ध आहे. गेल्या सातशे वर्षांपूर्वीपासूनचे मराठी भाषेतील लेखक आणि त्यांच्या साहित्यावर या ठिकाणी अभ्यास केला जाईल. याशिवाय मराठीच्या विविध बोलीभाषांवरही येथे संशोधन केले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील बी.एड. कॉलेज परिसरात छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय उभारले जात असून, याजवळच हे मराठी भाषा संग्रहालय साकारले जाणार आहे. येथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १ एकर जागेत विद्यार्थ्यांना येऊन पीएच.डी. (PhD) करता यावी आणि सखोल अभ्यास करता यावा, हा यामागील मुख्य हेतू आहे.

थिबा पॅलेस परिसर आणि पालगड येथे ‘पुस्तकांचे गाव’

दरम्यान, रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस परिसरात तसेच साने गुरुजींचे जन्मगाव असलेल्या दापोली तालुक्यातील पालगड येथे ‘पुस्तकांचे गाव’ विकसित केले जाणार असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे.

कोल्हापूर, संभाजीनगरसह अन्य जिल्ह्यांतही भाषा विकास केंद्र

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी मराठी भाषा विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वकोश निर्मिती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि मराठी भाषा समिती सदस्य प्रकाश देशपांडे उपस्थित होते.

रत्नागिरीच्या साहित्यिक वारशाचा गौरव

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, साने गुरुजी, कवी केशवसुत, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कविवर्य मंगेश पाडगावकर आणि मधु मंगेश कर्णिक अशा अनेक महनीय व्यक्तिमत्त्वांचा ऐतिहासिक व साहित्यिक वारसा रत्नागिरीच्या भूमीला लाभला आहे. याच समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वांङ्मयीन परंपरेमुळे महाराष्ट्रातील हे पहिले मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 28-07-2026