चिपळूण पालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटवले

चिपळूण : शहरातील मार्कंडी उपनगर परिसरात असलेल्या प्रभात रोडनजिकच्या नागरी वस्तीत जाणाऱ्या मार्गावर खासगी घर मालकाने कुंपण व प्रवेशद्वार लावून घोषीत झालेला सार्वजनिक रस्ता बंद केला, यामुळे नगर परिषदेने गुरुवारी दुपारी कारवाई करीत नागरिकांसाठी मार्ग खुला केला.

याबाबतच्या माहितीनुसार, प्रभात रोड मार्गावर असलेल्या वन विभाग रस्ता कार्यालयनजिकच्या जागेत काही नागरिकांनी सदनिका उभारल्या आहेत. रस्त्यापासून अंतर्गत भागात असलेल्या या सदनिकांकडे जाण्यासाठी सार्वजनिक न.प. कडून संबंधितांच्या मान्यतेने घोषीत करण्यात आला आहे. विकास आराखड्यात असलेला हा रस्ता अंतर्गत भागातील एका नागरिकाने लोखंडी तारेचे कुंपण व गेट लावून बंद केला होता. या संदर्भात नजिकच्या रहिवासी नागरिकांनी तक्रार केल्याने न.प.ने संबंधित रहिवाशाला नोटीसा पाठवून रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते; मात्र नोटिसा देऊनही चिपळूण शहरातील मार्कंडी उपनगरातील सार्वजनिक रस्त्याला अडथळा ठरणारे प्रवेशद्वार व कुंपण न.प.ने जेसीबीच्या सहाय्याने हटविले.

संबंधिताने हा रस्ता बंदच ठेवल्यामुळे अखेर प्रशासनाने गुरुवारी दुपारच्या सुमारास घडक कारवाई करीत लोखंडी तारेचे कुंपण व प्रवेशद्वार काढून टाकले व सार्वजनिक घोषीत केलेला रस्ता मोकळा केला.

दोन दुकानेही सील…
दरम्यान, मार्कडी येथील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत चालणा-या दोन दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात आली. एन. के. नायर यांचा टायर विक्री व्यवसाय आणि शिवराम पातकर यांचे महालक्ष्मी किराणा स्टोअर या दोन्ही दुकानधारकांकडून नगर पालिकेची मोठ्याप्रमाणावर भाडे थकबाकी होती. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने ही दोन्ही दुकाने सील केली. ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले व प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नगर पालिकेच्या या हालचालीमुळे मार्कडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातील अतिक्रमणकत्यांना याचा धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 23/Aug/2025