तृणबिंदूकेश्वरातील संततधार रुद्रानुष्ठान संपन्न

रत्नागिरी : श्रावण महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील श्री तृणबिंदुकेश्वरावर सुरू असलेल्या संततधार रुद्रानुष्ठानाची रविवारी उत्साहात सांगता झाली. सतत महिनाभर खंड न पडता तांब्याच्या अभिषेक पात्रामधून जलाभिषेक व सोबत रुद्राचे पठण अशा अत्यंत भावपूर्ण वातावरणात हे अनुष्ठान सुरू होते. श्रावण प्रतिपदेला सुरू झालेल्या या अनुष्ठानाची सांगता यशस्वीपणे झाली.

संततधार रुद्रानुष्ठानाला सुमारे १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. ब्रह्मवृंद मंडळाने रुद्रानुष्ठान चालू ठेवले असून ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानच्या वतीने आणि भाविकांच्या मदतीने हे रुद्रानुष्ठान प्रतिवर्षी आयोजित केले जात आहे. याला ब्रह्मवृंदांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच अनेक भाविक तीर्थ प्राशन करत असून अनेकांना आध्यात्मिक अनुभूती प्राप्त झाली आहे.

रत्नदुर्ग किल्ला विजापूरच्या सुभेदाराच्या ताब्यात असताना चिटणीस म्हणून कळझोंडी गावचे मुळ्ये नामक व्यक्ती काम करत. त्यांचे कुलदैवत तृणबिंदुकेश्वर. त्यामुळे त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी तृणबिंदूकेश्वराची स्थापना केली. मुळ्ये यांचा मूळ चौथरा फगरवठार येथे आहे. तृणबिंदुकेश्वराची स्थापना केल्यावर ते फगरवठार येथून दररोज सकाळी पूजेला येत असत. त्यांच्या वंशजांनी तृणबिंदुकेश्वरावर संततधारेची परंपरा सुरू केली, असे सांगितले जाते.

संततधारेच्या दरम्यान प्रत्येकी एक तासात रुद्र पठण केले जाते. यामध्ये दोन ब्रह्मवृंद काम करतात. एक रुद्रपठण व दुसरे पात्रामध्ये पाणी भरण्याचे काम करतात. याकरिता देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी तसेच सर्व विश्वस्त मंडळांचेही सहकार्य लाभले.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सुरू झाली संततधार
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून १९२९ मध्ये ही संततधार सुरू झाली. यासंबंधी आनंद माधव तथा नाना मराठे यांनी सांगितले की, माझ्या वडिलांचा जन्म १९१६ मधील. ते ९६ वर्षांचे असताना निधन पावले. त्यांनी आम्हाला सांगितलेली गोष्ट आहे की, वडीलही लहानपणापासून संततधारेसाठी जात असत. त्यावेळी त्यांनी ऐकलेली गोष्ट अशी की भाजीवाले मुळ्ये यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरिता संततधार रुद्रानुष्ठान सुरू केली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही संततधार आजतागायत सुरू आहे.

नित्य नवीन सजावट
श्री तृणबिंदुकेश्वरावर सतत जलाभिषेक सुरू असतो. अशा वेळी दिवसातून नित्य पूजा केली जाते. यामध्ये बेलाची पाने, विविध प्रकारची फुले, विड्याची पाने आणि विविध प्रकारची फळे, निरांजने आदी वापरून पिंडी भोवती आकर्षक सजावट केली जाते. तसेच पिंडीला चंदनादि गंध लेपन करूनही पूजन करण्यात आले. मंदिरातील पुजारी समीर गुरव यांनी पूजा करून आकर्षक सुशोभनही केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 25/Aug/2025