सर्पदंश झालेल्या ‘त्या’ रुग्णाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना नरेंद्र शंकर आंबेकर (वय ४८) या रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी आपत्कालीन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

रुग्णांच्या जीवाशी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट ताकीदही त्यांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी घेतलेल्या आपत्ती आढावा बैठक चर्चेवेळी गंभीर दखल घेतली आहे. घडल्या घटनेची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सामंत यांनी जाणून घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठित केली आहे. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.

रुग्ण आंबेकर यांच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे की, आपत्कालीन विभागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी गठित केलेली ही समिती सर्व बाजूंनी तपासणी करेल. डॉ. रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्षांनुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. यामुळे दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 25/Aug/2025