Ratnagiri Crime: शेजारी राहणाऱ्या महिलेच्या अंगणात विषारी विंचू उडवत केली शिवीगाळ; वृद्धेविरोधात गुन्हा दाखल

नाचणे परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद


Ratnagiri Crime News: रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथील श्रीरामनगर परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेच्या अंगणात विषारी विंचू उडवून देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात नोंद करण्यात आली असून ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:१७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वृद्ध महिला प्रीती मयेकर (वय ७२, रा. बंगला नं. १६९१, ए श्रीराम नगर नाचणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहा गुरव (वय ४५, रा. बंगला नं. १६९१, बी श्रीराम नगर नाचणे) यांनी ८ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दाखल तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित वृद्ध महिला प्रीती मयेकर हिने फिर्यादी स्नेहा गुरव यांची मुलगी सार्थकी गुरव हिच्या जीवाला धोका निर्माण होईल, या उद्देशाने विषारी विंचू झाडूने उडवून फिर्यादीच्या बंगल्याच्या गेटच्या आत टाकला. विंचू अंगणात टाकल्यानंतर संशयित महिलेने फिर्यादीच्या मुलीला शिवीगाळ केली.

या घटनेनंतर पीडित कुटुंबाने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. स्नेहा गुरव यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित वृद्ध महिला प्रीती मयेकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:31 10-08-2026