देवरूख : देवरूख आगारातून सकाळी ८.१५ वा. सुटणारी देवरुख-कानरकोंड ही बस सध्या उशीरा सुटत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. याबाबत आगारातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही कोणतीच पर्यायी व्यवस्था न करण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी देवरूख आगारावर धडक दिली. ही बस वेळेत न सोडल्यास सकाळी येणारी बसफेरी आंबवली परिसरातच अडवली जाईल, असा इशारा दिला.
देवरूख आगारातून आंबवली परिसरात यापूर्वी सकाळच्या वेळेत तीन फेऱ्या सुरू होत्या. सध्या सकाळची ८.१५ वाजताची कानर्कोंड ही एकच बसफेरी सुरू आहे. यामुळे या फेरीवर येथील ग्रामस्थ व विशेषतः विद्यार्थी अवलंबून असतात; मात्र ही फेरी देवरूख आगारातून उशिरा सुटते तसेच ती पुढे वांद्री येथे जात असल्याने परतीच्यावेळी विद्याथ्यर्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. याबाबत वारंवार देवरूख आगाराला भेट देऊनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी देवरूख आगारावर धडक दिली.
यावर लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था किंवा बस वेळेत सोडण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी आंबवली सरपंच दीप्ती सावंत, फणसट सरपंच विजय किर्वे व परिसरातील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 25/Aug/2025














