खेड बसस्थानकात संतप्त प्रवाशांनी रोखल्या लांब पल्ल्याच्या गाड्या

खेड : येथील बसस्थानकात रविवारी मुंबईहून रेल्वेने आलेल्या प्रवाशांनी आपल्या गावी जाण्यासाठी तासनतास उभे राहूनही एसटी बस उपलब्ध नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेऊन लांब पल्ल्याच्या गाड्या रोखल्या. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाकरमान्यांसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नियमित मार्गावर धावणाऱ्या एसटी गाड्या रद्द करून पाठविण्यात आल्याने येथील बसस्थानकात रेल्वेने आलेल्या व आपल्या गावी पोहोचण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळली आहे. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातून शेकडो बसेस मुंबईकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा ठप्प झाली आहे. खेड तालुक्यातील वाडीवस्त्यांमध्ये जाणाऱ्या सुमारे ७० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी खेड एसटी आगारात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संतापाचा बांध अखेर फुटल्याने रविवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकात सुमारे ५० ते ६० मुंबईकर प्रवाशांनी अचानक लांब पल्ल्याच्या मार्गावरील गाड्या अडवून आंदोलन केले. मात्र, येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसटी बस उपलब्ध नसल्याची हतबलता व्यक्त करून प्रवाशांची समजूत काढली.

मुंबईतून गणेशोत्सवात आपल्या तालुक्यात पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. मात्र, तालुक्यात आल्यानंतर आपल्या मूळ गावी पोहोचण्यासाठी प्रवाशांना बससेवेचा आधारच नसल्याने अनेक नागरिक तासनतास खेड आगारात अडकून पडले होते. मुंबईहून सोय करून ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आहे-दीपक मोहिते, सामाजिक कार्यकर्ते.

खेड बसस्थानकात रविवारी दिवसभर प्रवाशांनी संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. मुंबईहून आणलं, पण गावात सोडलंच नाही तर लोकांनी काय करायचं ? असा प्रश्न करत प्रवाशांनी निषेध नोंदविला. काही प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत असले तरी त्यासाठी दुप्पट-तिप्पट भाडं मोजावं लागत आहे- अशोक आंग्रे, नागरिक.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 25/Aug/2025