संगमेश्वर : यंदा तालुक्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीला पोषक स्थिती आहे. हळवी (११० दिवसात तयार होणारी) भातशेती नीट रुजून वर आली आहे. गणेशोत्सवानंतर लॉब्याही दिसू लागतील. सध्या भातशेती पसवायला लागली असली तरीही काही भागात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
संगमेश्वर तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत आहे. यंदा मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे धूळवाफ पेरण्यांची संधी शेतकऱ्यांना कमीच मिळाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप घेतल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात भातपेरण्या सुरू झाल्या. भातलावण्या आटोपण्यास जुलै महिना उजाडला. संगमेश्वर तालुक्यात ६ हजार ४७५ हेक्टरवर खरिपातील लागवड पूर्ण झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत तालुक्यात ३ हजार २८२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. टप्प्याटप्प्याने; परंतु समाधानकारक पाऊस झालेला असल्याने बळीराज्याला दिलासा मिळाला होता; परंतु ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हळवी म्हणजेच कमी दिवसात लागवड केलेली बियाण्याखालील क्षेत्र कमी आहे; मात्र ती भातं पसवायला लागली आहेत. त्यांना सध्या पडणारा पाऊस त्रासदायक असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
ही परिस्थिती असतानाच शेतकऱ्यांसमोर गोगलगायीच्या प्रादुर्भावाचे आव्हान आहे. स्थानिक कृषी विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन व उपाययोजना सुचवल्या जाव्यात, अशी सूचना शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक उपायांची माहिती, औषधांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे तसेच कृषी विभागाने तत्काळ गोगलगाय नियंत्रण मोहीम राबवावी तसेच वनविभागाने जंगली प्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:40 PM 30-Aug-2025














