khed jagbudi : जगबुडीच्या नव्या पुलाचे ‘ऑडिट’ कागदावरच

खेड : भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरून पाच महिन्यांपूर्वी कार दरीत कोसळून सहाजणांचा बळी गेला. त्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मोठमोठ्या घोषणा केल्या, १५ दिवसांत सेफ्टी ऑडिट करण्याचे आश्वासन दिले; पण आज चार महिने उलटूनही तो ऑडिट अहवाल कुठे आहे, असा ज्वलंत सवाल उपस्थित होत आहे.

हे आश्वासन फक्त कागदावर राहिले. प्रत्यक्षात मात्र नागरिकांचे जीव अजूनही धोक्यात आहेत. पुलावरील अपघातांची मालिका सुरूच असून, संरक्षक भिंत उभारण्याचे काम केवळ दिखावा ठरत आहे. ती भिंत खरंच प्राण वाचवेल का? महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी अपघातानंतर मोठ्या थाटामाटात पाहणी केली. थर्डपार्टीमार्फत ऑडिट करण्याची भाषा केली, अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिल्याचे सांगितले; पण पाच महिन्यानंतरही जनतेला हा अहवाल कुठेच प्रसिद्ध झाला नाही. सहा निरपराधांचा बळी गेल्यानंतरही जर प्रशासन इतकं निष्क्रिय राहणार असेल तर आणखी किती जीव गमवावे लागतील तेव्हा त्यांची झोप मोडणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

पुलाच्या ऑडिटसंदर्भात आम्ही वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला असून, त्या अहवालाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात प्रक्रिया सुरू असून, तसे आदेश पारीत झाल्यानंतर या पुलाचे ऑडिट करण्यात येईल. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पूर्ण केली असून, त्यावरती रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:49 PM 30-Aug-2025