रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदाच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काही शिक्षकांनी प्रशासनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे या पदोन्नतीवर माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
त्यामुळे अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासन आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रानडे यांनी प्रशासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञ वकील ऍड. आगाशे यांची नियुक्ती केली.
माननीय उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जुनी आणि नव्याने दाखल झालेली दोन्ही प्रकरणे एकत्रितपणे विचारात घेतली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने जिल्हा परिषदेला सहा आठवड्यांत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सुमारे 50 वरिष्ठ पदवीधर शिक्षकांना लाभ मिळणार आहे.
न्यायालयाच्या या आदेशाची प्रत जिल्हा परिषदेला मिळाली असून, लवकरच पदोन्नतीची तारीख निश्चित केली जाईल. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याबद्दल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी उच्च न्यायालय, पालकमंत्री ना. उदय सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रानडे आणि शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांचे आभार मानले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 30-08-2025














