Rajapur : जवळेथर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

पाचल : राजापूर तालुक्यातील जवळेथर रस्त्यावरील मूर सुतारवाडी ते तळवडे-ताम्हाणे फाटा दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गणेशोत्सवाआधी या रस्त्याची दुरुस्ती अपेक्षित होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे लोकांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुरेश गुडेकर यांनी दिला आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. पाहणी दौरा करून ते ओणी पाचल अणुस्कुरामार्गे कोल्हापूरला जाणार होते. मंत्री येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आणि दोन दिवसात ओणी- पाचल रस्त्यावरील सर्व खड्डे पाऊस असतानाही ग्रीट, वाळू, सिमेंट, खडी व रोलर फिरवून भरण्यात आले. रस्ता चकाचक करण्यात आला. मात्र, सर्वसामान्य जनता बारमाही खड्ड्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. सतत पडणारा पाऊस, अवजड वाहनांची वाहतूक अशा कारणांमुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. मोऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्त्याच्या साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणारे सर्वचजण जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले नाही तर राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघ पाचल, परिसरातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुरेश गुडेकर यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:22 PM 30-Aug-2025

Gadre1