Ratnagiri: धान्य दुकानदारांचे कमिशन थकीत; पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण : गणेशोत्सव सुरू असतानाही जिल्ह्यातील धान्य दुकानदारांना थकीत कमिशन मिळालेले नाही. जून महिन्यापासूनचे कमिशन मिळावे, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेने केली आहे.

या मागणीचे निवेदन पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांना देण्यात आले.

या संदर्भात जिल्हाध्यक्षा अशोक कदम यांनी सांगितले, शिधापत्रिकाधारकांना शासन देत असलेले धान्य दुकानदारांमार्फत वाटप केले जात आहे; मात्र, दुकानदारांना त्यांच्या मेहनतीचे कष्टाचे कमिशन वेळेवर मिळत नसल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली असून, भुजबळ यांनी दुकानदारांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार थकीत कमिशनसाठी आवश्यक निधी जिल्हा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात आला असून, त्या आधारे मेपर्यंतचे कमिशन देण्यात आले. तथापि, जून महिन्याचे कमिशन अजूनही प्रलंबित आहे. २०१९ पासून लागू झालेल्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. २०१३ ते १८ या कालावधीत धान्य वाहतुकीच्या फरकाची थकबाकी दुकानदारांना देणे बाकी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांना थकबाकी मिळावी जेणेकरून तेही सण साजरा करू शकतील, अशी मागणी धान्य दुकानदारांनी केली आहे. याबाबत प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 01-09-2025