धनंजय यादव, मनीष दळवी राज्य काजू मंडळावर

दापोली : शासनाने राज्यातील काजू उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवे स्वतंत्र संचालक नेमले आहेत. शासननिर्णयान्वये दापोलीचे धनंजय यादव यांची सहकारी काजूप्रक्रिया प्रकल्प महासंघाचे प्रतिनिधी म्हणून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याचे मनीष दळवी यांची काजूक्षेत्रातील तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

राज्य काजू मंडळाची स्थापना १६ मे २०२३ रोजी करण्यात आली होती. सुरवातीला या मंडळात १२ संचालक आणि १ सदस्य सचिवांचा समावेश होता. २२ ऑगस्ट रोजी शासनाने मंडळाची सुधारित रचना जाहीर केली असून, स्वतंत्र संचालकांची संख्या ४ वरून ११ करण्यात आली आहे. या बदलामुळे मंडळ अधिक सर्वसमावेशक होत असून, विविध क्षेत्रांना व्यापक प्रतिनिधित्व मिळाले आहे. यादव हे दापोलीतील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सभापती आहेत तसेच कोकण काजू प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच मनीष दळवी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील असून, काजू उत्पादनक्षमता वाढवणे, प्रक्रिया तंत्रज्ञान सुधारणा आणि निर्यातक्षमता वृद्धिंगत करण्याबाबत त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 01-09-2025