संगमेश्वर : कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी अवजड वाहनांना काही दिवस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करण्यासाठी शासनाचे मनाई केली आहे, तरीही राजरोसपणे अवजड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. शनिवारी रात्री संगमेश्वर येथील सोनवी पुलावर अवजड वाहनांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिका अडकून पडल्या, मात्र वेळीच महामार्ग पोलिसांनी मार्ग काढून दिल्याने त्या रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ झाल्या.
महामार्गावरील वाहतूक कोंडी हा सध्या मोठा प्रश्न झाला आहे. स्रणवाहिकेसाठी विशेष सुविधा दिली गेली आहे. सायरन वाजवल्यानंतर रस्ता मोकळा करून दिला जातो. पण, कधी-कधी वाहतूक कोंडीतून त्यानाही पुढं जाता येत नाही. एक मुंबईच्या दिशेने तर दुसरे गोव्याच्या दिशेने जाणारी दोन मोठी अवजड वाहने येथील सोनवी पुलाच्या मध्य अंतरावर एकत्र आली आणि पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक कोंडी झाली होती.
यावेळी सायरन वाजवत एका पाठोपाठ दोन रुग्णवाहिका मार्ग काढत सोनवी पुलापर्यंत आल्या मात्र पुलावरील दोन अवजड वाहनांमुळे रस्ता मोकळा नसल्याने आधीपासून खोळंबलेल्या वाहतूक कोंडीत दोन्ही रुग्णवाहिकांनाही ब्रेक लावावा लागला. महामार्ग पोलिस रियाज मुजावर आणि त्याचे सहकारी पोलीस यांनी मोठ्या कसरतीने वाहतूक कोंडी सोडवून प्राधान्याने दोन्ही रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून दिला. तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकानी निःश्वास टाकला.
अवजड वाहनांना अटकाव नाही
गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासात अडथळे येऊ नये म्हणून मोठ्या व अवजड वाहनांना निर्बंध असताना अशी वाहने महामार्गावर धावतातच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रादेशिक परिवहन आणि महामार्ग पोलिसांच्या नजरेतून एवढी मोठी वाहने कशी काय चुकतात ? अशा वाहनांवर का कारवाईचा बडगा उचलला जात नाही, अशी चर्चा सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 01-Sep-2025














