Lanja : विसर्जन मिरवणुकीतील कचऱ्याचे संकलन करून दिला स्वच्छतेचा संदेश

लांजा : भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत रस्त्यावर पडलेला प्लास्टिक, पाणी बाटल्या व पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कचरा जमा करून स्वच्छतेचा संदेश दिला.

लांजा तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. १९८२ पासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. या मिरवणुकीत फक्त ज्योतिबाची पिंजर वापरली जाते. इतर कोणताही रासायनिक कलर वापरला जात नाही, हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या इमारतीपासून दोन किलोमीटर ही सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक निघते. या मिरवणुकीत तरुण कार्यकर्ते, मिरवणुकीत आलेल्या लोकांसाठी नाश्ता व पाण्याची सोय करतात. मिरवणुकीत ५०० ते हजारपर्यंत लोक उपस्थित असतात. यावर्षी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकही पॅकिंगचा कागद किंवा प्लास्टिकची पाण्याची बॉटल रस्त्यावर पडेल व पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे घडू नये म्हणून सोबत आणलेल्या पिशव्यांतून हे सर्व जमा केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 10/Sep/2025