Uday Samant | दापोली औद्योगिकसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : दापोली औद्योगिक क्षेत्राला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारणीची कार्यवाही पुढील ८ दिवसांत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महावितरणला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, उद्योजक व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, महावितरणने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा व्हायला हवा. रस्त्यांची खोदाई करण्यापूर्वी नगरपालिकेकडून परवानगी घेणे आणि पूर्तता करणे ही जबाबदारीने करावी. तसेच उद्योजकांनी स्वतः हूनही या मागणीचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी दापोली औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण एमआयडीसीकडून करण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्राचा मोठा भाग अधिग्रहित करूनदेखील मोबदला दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले व तो एमआयडीसीकडे जमा करण्यास सांगितले. तसेच औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत कब्जे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रात माथाडी कायद्याची अंमलबजावणी, लोटे परशुराम येथे ईएसआयसी सेवांसाठी खासगी रुग्णालयांशी आठ दिवसांत करार, खेर्डी एमआयडीसीत फायर स्टेशन सुरू करण्याचे आदेशही डॉ. सामंत यांनी दिले.

निर्यातवाढीसाठी जिल्ह्यातील आंबा, काजू व मासे या उत्पादनांच्या निर्यातीसाठी स्थानिक जेट्टींचा वापर करण्याची सूचना करताना, यामुळे कीच चांगला परिणाम दिसून येईल, असेही ते म्हणाले. तसेच शासनाने दिलेल्या परंतु पडून असलेल्या शासकीय जागा परत घेऊन त्या प्रकल्पांसाठी उपयोगात आणाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत दापोली, खेर्डी व लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रांच्या प्रलंबित मागण्यांवरही चर्चा झाली व त्यांना गती देण्याचे अश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 15/Sep/2025