मुंबई : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या जागावाटप जवळपास पूर्ण होणार, असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन चर्चा सुरु आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र ठरलं नाही आणि ठरणार नाही. महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा आणि आघाडीची सर्कस चालवणारा चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, सलग चार दिवस महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते जागा वाटपासाठी बसलो यातलं गांभीर्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जो जिंकेल तो त्या जागेवर लढेल हे आमचं सूत्र आहे. 288 जागांवरती नजर देताना प्रत्येक घटकाचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. चार दिवस बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात. पुन्हा बसावं लागतं आणि काही कॉल घ्यावे लागतात, प्रत्येकाची स्वातंत्र मत असतात, पण हे जागा वाटप शांततेत आणि सहज पार पडेल.
आमचे एकच सूत्र आहे एकत्र लढायचं आणि आमचं सरकार आणायचं, त्यासाठी कोणाला त्याग करावा लागला तरी चालेल. दोनशे जागांवर आमच्यामध्ये संमती झाली असेल तर ज्या बातमीचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. मी तर म्हणेल 288 जागावरती आमची सहमती आहे. 288 जागांचं आमचं जागावाटप सुरळीत पार पडेल.
आम्ही कोणताही फॉर्म्युला समोर ठेवून निवडणुका लढत नाही, लोकसभेला कुठलाही फॉर्मुला नव्हता. याच्या वाटेला ज्या जागा आल्या त्या आम्ही लढल्या. विधानसभेला सुद्धा आम्ही अशाच प्रकारे कुठल्याही फॉर्मुला विना निवडणूक लढू. आघाडीच्या जागावाटप आम्ही एवढ्या जागा लढवू तेवढ्याच जागा लढू असं होऊन होणार नाही.
एका जागेवर दोन किंवा तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांचा दावा असू शकतो मी नेत्यांचा म्हणत नाही. अशा जागांवर आम्ही पुन्हा पुन्हा बसून मार्ग काढू. यावर आम्ही टोकाला जाणार नाहीत. चार दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा एक दोन दिवस वस्तू आणि जागावाटप पूर्ण करू. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी जागावाटप पूर्ण होईल. जागावाटप पूर्ण झाल्यावर जाहीरनाम्यावर बैठका घेऊ किंवा एकत्रित प्रचार कसा करता येईल यावर काम करू.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची जर इच्छा असेल मुख्यमंत्री होण्याची तर त्यांच्या पक्षाने तसेच जाहीर केलं पाहिजे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा येईल तीन पक्षांचे बळ मिळून मुख्यमंत्री ठरेल. आघाडीची सर्कस उत्तमपणे कोण चालू शकतो आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाचा कोणता चेहरा मान्य आहे ? यावर चर्चा होऊन निर्णय होईल. जशी जागा वाटपात रेस नाही तशी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सुद्धा रेस नाही. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा कोणताही सूत्र ठरलेलं नाही आणि ठरणारही नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 21-09-2024