गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील विलोभनीय समुद्रकिनारा भुरळ पाडतो. मग या विलोभनीय समुद्रात स्नान केल्याशिवाय पर्यटकांना मोह आवरताच येत नाही. त्यातूनच मग अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिकांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत पर्यटक अतिउत्साहीपणा दाखवत असल्याने येथील किनाऱ्यावर दुर्घटना घडत आहेत. रविवारी दुपारी १.४५ रोजी मुंबईतील दोघा पर्यटकांना बुडताना स्थानिकांनी वाचवले. यामुळे येथील समुद्रकिना-यावरील पर्यटकांचा अतिउत्साहीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नियमित पावसाळा सरला असला तरी अवकाळीचे सावट कायम आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसून येत आहे. जोरदार लाटा उसळत असून, पाण्यालाही जोर आहे. अशा वातावरणात समुद्रात उत्तरणे धोकादायक ठरते. समुद्रात पडलेले चाळ, खड्डे यांचा अंदाज येत नसतो. समुद्राच्या या धोकादायक स्थितीविषयी जीवरक्षक व समुद्र चौपाटीवरील स्थानिक व्यावसायिकांकडून पर्यटकांना समुद्राच्या स्थितीविषयी वारंवार माहिती व सूचना दिल्या जातात. मात्र, या सर्वच सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते.
पर्यटकांचा अतिउत्साहीपणा आणि अतिरेक समुद्रात समुद्रस्नान करताना जीवावर बेतला आहे. गेल्या काही वर्षांत गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिकांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारी सुरू झालेल्या वाॅटर स्पोर्टच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक कमी झाले. पावसाळ्याचे चार महिने वॉटर स्पोर्ट व्यवसाय बंद असल्यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक व्यावसायिकांनी आपली जबाबदारी ओळखून गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांना सूचना देण्याचे काम नित्यनियमाने केले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. रविवारी दोघांना बुडताना वाचवण्यात आले. या घटनेनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचे आणि बेजबाबदारपणाचे कारण समुद्रातील दुर्घटनेला कारणीभूत ठरत असल्याचे मत स्थानिक व्यावसायिक आणि सर्वच स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे
येथे येणाऱ्या पर्यटकांनी स्थानिक जीवरक्षक, व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्या सूचनांचे पालन करून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे, असे मत व्यक्त होत आहे. शिवाय समुद्र चौपाटीवरील वाॅटर स्पोर्ट व्यावसायिकांच्या माध्यमातूनही पर्यटकांनी अधिक माहिती जाणून घेण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 22/Oct/2024














