Chiplun : खासगीकरणाच्या निषेधार्थ वीज कामगारांचा संप

चिपळूण : तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेच्या निषेधार्थ वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ४२ हजार कंत्राटी कामगार ९ ऑक्टोबरला एकदिवसीय संपावर जाणार आहेत. यामध्ये पोफळी महानिर्मिती केंद्रातील ५५० पैकी ४२५ अधिकारी व कामगार संपात सहभागी होणार आहेत; मात्र आठ अभियंते आणि १२५ तांत्रिक कामगार संपात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर संपाचा कुठेही परिणाम होणार नाही, अशी माहिती विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष संतोष घाडगे यांनी दिली.

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध पद्धतीने खासगीकरणाची अंमलबजावणी सुरू असल्याचा आरोप उद्याच्या संपासाठी तिन्ही कंपन्यांतील अधिकारी व कामगारांची कृती समिती स्थापन केली आहे. महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरणाचे परवाने देणे, ३२९ उपकेंद्रांचे कंत्राटीकरण, महापारेषणमधील २०० कोटींपेक्षा अधिकच्या प्रकल्पांचे खासगीकरण तसेच महापारेषण कंपनीचा आयपीओद्वारे शेअर बाजारात समावेश करण्याचा प्रस्ताव याला समितीचा तीव्र विरोध आहे. महानिर्मिती कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण आणि वीज कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी देखील हा संप पुकारण्यात आला.

२०२३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही, तसेच त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य राज्य सरकारकडून दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 09/Oct/2025