चिपळूण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास लागून असलेल्या शिरगांव-तळसर गावाच्या सीमेवरील जंगलात पट्टेरी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असताना त्यांच्या पंजाचे ठसेही सापडल्यानंतर जिल्हा वनविभाग सतर्क झाला. सोमवारी सायंकाळी पथकाने घटनास्थळी जाऊन ठसे मिळालेल्या ठिकाणी प्लास्टर कास्टिंगसह या परिसरात चार ट्रॅप कॅमेरे जंगलात बसवले आहेत. प्रथमदर्शनी वाघ असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला असून, काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेतले आहेत.
गेल्या वर्षी तळसरच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा सापडल्या होत्या. तेथील म्हशींची शिकार करून खाण्याची पद्धत, पंजाचा ठशाचा आकार लक्षात घेत वनविभागाने पाच ट्रॅप कॅमेरे बसवले होते; मात्र पुढे त्यांच्या कोणत्याही हालचाली सापडलेल्या नाहीत.
त्यानंतर जानेवारीमध्येही अशाप्रकारे पुन्हा पाऊलखुणा आढळल्या होत्या; मात्र गेले दोन दिवस त्यांच्या अस्तित्वाबाबत या परिसरातील जंगलात रानकुत्र्यांवर पी. एचडी करत असलेल्या राणी प्रभुलकर हिला वाघाची डरकाळी स्पष्टपणे ऐकायला मिळाली. त्याचबरोबर त्याच्या पायाचे ठसे मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले यांनी घटनास्थळी धाव घेतली. वस्तीपासून तब्बल सहा किमी अंतरावर जंगलात जाऊन पाहणी केली. या वेळी या भागात चार ट्रप कॅमेरे बसवले. पंजाच्या ठशाचा आकार हा सतरा सेमी आढळून आला. आता प्लास्टर कास्टिंग करून तपासले जाणार आहे. त्याबरोबर काही नमुनेही घेतले गेले असून, ते पुढे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. प्रथमदर्शनी हा वाघ नर जातीचा असून, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातूनच तो खाली उतरला असल्याचे प्रथमदर्शनी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या जंगलात ऐकू येत असलेली डरकाळी आणि मिळालेले पंजाचे ठसे यावरून प्रथमदर्शनी हा पट्टेरी वाघ असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या भागात त्याचा वावर सुरू झाला असून, या संदर्भात घटनास्थळावरून काही नमुने घेण्यात आले आहेत. ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वरिष्ठ स्तरावर या संदर्भात अहवाल दिला जाणार आहे. – गिरिजा देसाई, विभागीय वनाधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 09/Oct/2025














