Chiplun : सती येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर विजय गमरे (२६) या तरुण आणि अष्टपैलू कबड्डीपटूचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कराड येथील रुग्णालयात मृत्यूशी त्याची झुंज अपयशी ठरली, ज्यामुळे वेहेळे गाव आणि कबड्डी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी वेहेळे येथून चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना, सतीजवळ त्याची दुचाकी अन्य एका दुचाकीवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात सागर गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अधिक उपचारांसाठी त्याला कराड येथे हलवण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

सागर गमरे हा अनेक वर्षांपासून भीम संघर्ष वेहेळे या स्थानिक संघातून कबड्डी खेळत होता. त्याच्या सर्वांगसुंदर खेळाने त्याने ग्रामीण स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या उत्कृष्ट खेळामुळेच संघाने विजय मिळवला होता. काही वर्षांपूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या सागरच्या अकाली निधनामुळे वेहेळे गावावर आणि संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेहेळे गावातच त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 09/Oct/2025