रत्नागिरी : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी रत्नागिरीत करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या मागितल्या आहेत. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत करावी. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज राज्य सरकारने माफ करावे. पीक विमा योजनेचे कठीण नियम रद्द करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जुन्या निकषांचा आधार न घेता योग्य व पुरेसा मोबदला द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम म्हणाले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेती,घरे दारे आणि पशुधन वाहून गेले आहे.शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. अडचणीत सापडलेल्या या अन्नदात्याला सरकारने तात्काळ मदत करावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 09/Oct/2025














