कोल्हापूर : प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एरंडोली (ता. मिरज) येथे उपसंचालकांनी भेट दिली. तेव्हा कॉन्फरन्स हॉल आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोलीत वैद्यकीय साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे व फ्रिजमध्ये घरगुती साहित्य ठेवल्याचे दिसून आले होते. तसेच हेल्थ एटीएम मशिन वापरात नव्हते. १३ सप्टेंबर रोजी भेट दिली तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता आनंदराव पवार अनुपस्थित होत्या.
त्या एसएनएसपी बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. परंतु त्या बैठकीलाही अनुपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात ६७ पैकी ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२५ पर्यंत एकही प्रसूती झालेली नाही. याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांना तर सिंधुदूर्ग जिल्हातील फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता, कमी प्रसूती, अनुपस्थित कर्मचारी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
आठ दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्याची कार्यशाळा घेतली होती. तेव्हा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी संबंधितांना नोटीस काढल्या आहेत. – दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य मंडळ, कोल्हापूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:15 13-10-2025














