Rajapur : शहरातील असुविधेबाबात राजापूरकरांचा नगर पालिकेवर हल्लाबोल

राजापूर : शहरातील रस्त्यांची खड्यांमुळे दुरवस्था झाली असून, पथदीप बंद आहेत. शौचालयांमध्ये अस्वच्छता, मच्छीमार्केट असूनही रस्त्यावर होणारी मच्छीविक्री आरोग्याला हानीकारक ठरत आहे. मोकाट गुरे, बेशिस्त आठवडा बाजार, अनियमित होणारा पाणीपुरवठा यामुळे राजापूरवासीय त्रस्त झाले आहेत. याला नगरपालिकेचा अंदाधुंदी कारभार जबाबदार आहे. लोकांकडून नगरपालिका विविध कर आकारणी करत असली तरीही तुलनेत सोयीसुविधा देत नाही, असे आरोप करत राजापूरवासीयांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.

शहरातील रखडलेली विकासकामे आणि विविध समस्यांबाबत आज राजापूरवासीय नगरपालिकेवर धडकले होते. या वेळी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, जयप्रकाश नार्वेकर, कल्याणी रहाटे, माजी नगरसेवक विनय गुरव, सुभाष बाकाळकर, अनिल कुडाळी, आजीम जैतापकर, अमृत तांबडे आदी उपस्थित होते. नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक अमित पोवार, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुप्रिया गोडेकर, बांधकाम अभियंता रणवीर कोकरेदेसाई, करनिरीक्षक प्रकाश शिंदे स्वप्नील पड्यार आदींनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.

याप्रसंगी अॅड. खलिफे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना ठणकावले. लोकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. येत्या आठवडाभराच्या कालावधीत लोकांच्या मागणीप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली नाही तर मोर्चा काढू असा इशाराही दिला. याप्रसंगी पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक प्रचंड संतापले होते. विकासकामे आणि समस्यांबावत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले. महामार्गाला जोडणारा कोढेतड येथील रस्त्याच्या दुरुस्तीसह पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा कोंढेतडवासीय उपोषण करतील, असा इशारा माजी नगराध्यक्ष रहाटे यांनी दिला. प्रशासनाकडून केवळ आश्वासने नको तर थेट कार्यवाही पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 17/Oct/2025