चिपळूण : शहरातील मुरादपूर-पेठमाप पुलाच्या कामासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेचा अहवाल पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी चिपळूण न.प.चे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिल्या आहेत. या रस्त्याचे सुमारे सहा कोटी रुपयांचे काम मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या बाबतच्या तक्रारीत मुकादम यांनी म्हटले आहे की, या कामासाठी ९ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यांची तांत्रिक पडताळणी केल्यानंतर अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठेकेदारांना मुख्याधिकाऱ्यांनी कळविले; मात्र बहुतांश ठेकेदारांना पूर्तता करता आली नाही. त्यामुळे फेरनिविदा काढणे गरजेचे होते. मात्र तसे न करता मुख्याधिकारी व निविदा समितीने ८ निविदा पात्र ठरविल्या. त्यातही अटी-शर्तीची पूर्तता होत नसल्याने त्या रद्द केल्या, केवळ मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी हा खटाटोप झाला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी व याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुकादम यांच्या पत्राबाबत योग्य ती कार्यवाही करून त्यांना परस्पर कळवावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता मुख्याधिकारी याबाबत काय अहवाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 31/Oct/2025














