दापोली : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार समोर आला आहे. रविवारी, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास काही पर्यटकांनी समुद्राच्या उथळ पाण्यातच भरधाव कार चालवून थरार माजवला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही गाडी नाशिक क्रमांकाची MH 15 KG 4737 होती. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, पर्यटकांनी पाण्यातून कार चालवत रेस केल्यासारखा प्रकार करत फोटो व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला.
या वेळी काही स्थानिकांनी तत्काळ धाव घेत या पर्यटकांना थांबवले आणि त्यांची समजूत काढली. पाण्यातील अशा प्रकारामुळे समुद्रकिनारी उपस्थित इतर नागरिक आणि लहान मुलांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता होती. या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.
पोलिसांनी संबंधित वाहन व पर्यटकांविषयी चौकशी सुरू केली आहे. स्थानिक प्रशासनालाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली असून, समुद्रकिनारी अशा बेफिकीर वर्तनावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दापोली तालुक्यात अशा प्रकारच्या घटनांची मालिका सुरूच आहे. मुरुड किनाऱ्यावर घडलेला हा तिसरा प्रकार असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाळ्यानंतर वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे किनाऱ्यांवर सुरक्षेचा अभाव आणि पोलिस गस्त कमी असल्याची चर्चा सुरू आहे. सामान्य नागरिक आणि स्थानिक मत्स्य व्यवसायिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पर्यटकांच्या निष्काळजी व धोकादायक वर्तनामुळे कोणताही अपघात किंवा जीवितहानी घडू नये.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 04/Nov/2025














