India CDS : लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी भारताचे नवे संरक्षण प्रमुख


India CDS : 
भारत सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी (Lieutenant General N. S. Raja Subramani) यांची नवीन संरक्षण प्रमुख (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेशापर्यंत ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील.

सध्याचे संरक्षण प्रमुख, जनरल अनिल चौहान, यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी संपत आहे. परिणमी सुब्रमणी त्यांची जागा घेतील. ईशान्य भारत आणि काश्मीर दोन्ही मधील घुसखोरी विरोधी मोहिमेचा अनुभव असलेले लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमनी (निवृत्त) (N. S Raja Subramani) हे सध्याचे सीडीएस अनिल कुमार चौहान (Anil Chauhan) यांच्या जागीकार्यरतहोणारआहे. ते या महिन्यात वयाची 65 वर्षे पूर्ण करताहेत. १८ मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे ही नियुक्ती करण्यात आल्याचीमाहितीआहे.

Who is New CDS NS Raja Subramani: प्रदीर्घ लष्करी कारकिर्दीसह भूमिका पार पाडणारे नवे CDS कोण?

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी हे 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीत लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले होते. तसेच, त्यांनी मार्च 2023 ते जून 2024 या काळात सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम पाहिले होते. लष्करी सेवेचा दांडगा अनुभव आणि अनेक पदांवर काम केल्यामुळे, त्यांची आता देशाचे नवे संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

NS Raja Subramani: एन. एस. राजा सुब्रमणी यांनी भारतीय सैन्यात किती काळ सेवा केली?

निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी भारतीय सैन्यात जवळपास 39 वर्षे सेवा केली. उप-सेनाप्रमुख (VCOAS) पदावरून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणूनही काम केले. आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर, एन. एस. राजा सुब्रमणी यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून एम.ए. (Master of Arts) पदवी आणि मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासात एम.फिल. (MPhil) पदवी मिळवली आहे.

New CDS NS Raja Subramani: अनेक जबाबदाऱ्या आणि ऑपरेशनल तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका

एन. एस. राजा सुब्रमणी डिसेंबर 1985 मध्ये भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्स रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यांच्या प्रदीर्घ लष्करी कारकिर्दीत, त्यांनी देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवर अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि ऑपरेशनल तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मार्च 2023 ते जून 2024 पर्यंत, त्यांनी लखनौ येथील भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम पाहिले. त्यानंतर, जुलै 2024 मध्ये, त्यांची भारतीय लष्कराचे 47वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली, हे पद त्यांनी जुलै 2025 पर्यंत भूषवले.

NSCS : राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर, सप्टेंबर 2025 मध्ये एन. एस. राजा सुब्रमणी यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर भारत सरकारने त्यांची देशाचे नवीन संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) म्हणून नियुक्ती केली. राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट सेवेची आणि नेतृत्वाची दखल घेऊन, त्यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM), सेना पदक (SM) आणि विशिष्ट सेवा पदक (VSM) यांसारखे अनेक प्रतिष्ठित लष्करी सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे भारतीय सैन्यात त्यांच्या शिस्त, नेतृत्व आणि सामरिक ज्ञानासाठी ओळखले जातात. सैन्यात अनेक पदांवर काम करत असताना त्यांनी देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 09-05-2026