Ratnagiri: खेडचा अनुराग वाघमोडे राज्यात प्रथम!

खेड (रत्नागिरी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात खेड तालुक्याने राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपला दबदबा निर्माण केला आहे. भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिराचा विद्यार्थी अनुराग महादेव वाघमोडे याने १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

अनुरागच्या या ऐतिहासिक यशामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यशाची दैदिप्यमान परंपरा: राज्यात तृतीय व चतुर्थ क्रमांकही खेडकडे

ज्ञानदीप विद्यामंदिराने केवळ प्रथम क्रमांकच नाही, तर राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

  • वृषभ दिगंबर देवघरकर: ९९.६० टक्के (राज्यात तृतीय क्रमांक)
  • दिशा दिलीप मोहिते: ९९.४० टक्के (राज्यात चौथा क्रमांक)
  • आर्यन बाळासाहेब भगत: ९८.८० टक्के (प्रशालेत चौथा क्रमांक)
  • शिवराज राजेश सूर्यवंशी: ९८.४० टक्के (प्रशालेत पाचवा क्रमांक)

सलग २५ वर्षे १०० टक्के निकालाचा ‘सिल्व्हर ज्युबिली’ विक्रम

प्रशालेने यंदाही १०० टक्के निकालाची आपली गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. यंदा परीक्षेला बसलेले सर्व ४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही शाळा सातत्याने १०० टक्के निकाल लावत आहे.

विषयनिहाय गुणवंतांचा झंझावात

अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयांत पैकीच्या पैकी (१००/१००) गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले आहे:

  • संस्कृत: अनुराग वाघमोडे, वेदा शिरीषकर, विश्वश्री केंद्रे, आर्या बेंद्रे (प्रत्येकी १०० गुण)
  • गणित: वृषभ देवघरकर, दिशा मोहिते, आर्य चिले, इंद्र पाटणे (प्रत्येकी १०० गुण)
  • विज्ञान व समाजशास्त्र: अनुराग वाघमोडे (दोन्ही विषयांत १०० गुण)
  • मराठी: वेदा दिनेश शिरीषकर (९९ गुण)
  • इंग्रजी: अनुराग वाघमोडे (९८ गुण)

मार्गदर्शक आणि मान्यवरांकडून कौतुक

विद्यार्थ्यांच्या या यशात संस्थेचे सल्लागार श्रीरंग बापट, मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले आणि सर्व शिक्षक वृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त दीपक लढढा, पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे तसेच संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांच्यासह ज्ञानदीप परिवाराने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 09-05-2026