चिपळूण : परशुराम येथील श्री क्षेत्र भार्गवराम डोंगरमाथ्यावर सवतसडा धबधब्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती प्रज्वलन कार्यक्रमास त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री जुना काळभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून प्रारंभ होणार आहे.
ज्या भाविकांना यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजता श्री ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परशुराम मंदिरात जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता श्री देव भार्गवराम परशुराम देवस्थानातून मशाल पेटवून बजरंग मित्र मंडळ व भक्तगण पायरवाडीकडून टेकडीवरील दीपमाळेकडे प्रस्थान होणार आहे.
महेंद्रगिरी पर्वतावरील या पणतीची स्थानिक ग्रामस्थ व चिपळुणातील तरुणांनी पुढाकार घेत डागडुजी केली. यासाठी नितीन लोकरे, अभय शिंदे, राजा राऊत, अमोल जोगळेकर, विजय पाथरे, समीर राऊत, अभी शेट्ये, दिनेश पटवर्धन, संकेत राऊत, अभी राऊत, साहील रानडे, संतोष शिंदे, देवेंद्र गोंधळेकर, प्रवीण गोंधळेकर, सुरेश बहुतले, अभय सहस्त्रबुद्धे, ओंकार गोखले, विनय पिंपुटकर, उत्कर्ष नाखरे, जयदीप जोशी, संतोष मोरे यांनी पुढाकार घेतला.
पणती प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ पंचा जांभा दगडात कोरलेली ही दीपमाळ शिवकालीन असून महेंद्रगिरी पर्वतावरील एका उंच शिखर माध्यावर आहे. दीपमाळेच्या बांधकामात जांभा दगडाचा वापर केलेला आहे. या दीपमाळ शिखर बिन्दूवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांचे दर्शन होते.
त्याचप्रमाणे चिपळूण शहरातून या दीपमाळेचे दर्शन होते. दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट आहे. ही भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली असून त्यामधे १ डबा (१५ किलो) गोडेतेल व १ पंचाचे म्हणजे धोतर पान वातीसाठी वापरले जात असे. या पणती प्रज्वलनाचे २२वे वर्ष असून चिपळूण शहर व परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी २२ वर्षांपूर्वी खंडित झालेले दीपप्रज्वलन पुनश्च सुरू केले. चिपळूणचे ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या श्री क्षेत्र परशुराम पणतीच्या प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ पंच्या (धोतराचे पान) दिले जाते. या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम मूर्तीच्या अंगावर पडतो, असे जाणकार मंडळी सांगतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 05/Nov/2025














