कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

आरवली : ऑक्टोबर महिना संपला तरी अजूनही अवकाळी पाऊस, वादळे व अवेळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेउन मराठवाडा, विदर्भाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे मुंबईत प्रत्यक्ष भेटीत निवेदनाद्वारे केली आहे. यावर ना. पवार आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली.

या निवेदनात आ. निकम यांनी म्हटले आहे की, कोकण विभागात गेल्या दोन आठवड्यापासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, वादळे व परतीच्या पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भात पीक पावसामुळे भिजून आडवे पडले असून अनेक ठिकाणी पिकांना पुन्हा कोंब फुटले आहेत. काही भागात तर शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत.

या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग अत्यंत चिंतेत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या भात पिकावर या नैसर्गिक आपत्तीने मोठा आघात केला आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.

कोकणातील शेतकरी अनेक संकटे झेलूनही तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही, परंतु यावर्षीची परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तसेच चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीसंदर्भात देखील आ. निकम यांनी ना. पवार यांच्याशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 05/Nov/2025