Chiplun : नुकसानग्रस्त गावांचे संयुक्त पंचनामे करण्याचे महसूल, पंचायत समितींना आदेश

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याचे भात व नाचणी या प्रमुख हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच आता महसूल विभागासह पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग असे संयुक्तपणे तालुक्यातील १६८ गावांत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तहसीलदार प्रवीण लोकरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील आणि तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे या तिन्ही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तालुक्यातील १३० ग्रामपंचायत क्षेत्रात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.

तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार, तालुक्यातील एकूण १६८ गावांमध्ये सबंधित गावाचे ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे करण्यात येणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले असून, शेतकऱ्यांचे नुकसान वास्तव स्वरूपात नोंदवून तालुकास्तरीय समितीकडे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाया गेल्याने चिंता वाढली आहे. शेतकरीवर्गान शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून, पंचनाम्यानंतर नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 05/Nov/2025