Solar Ruff Top Yojana : रूफ टॉप योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल ग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महावितरणने एक सुवर्णसंधी मिळवून दिली आहे. त्यांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेअंतर्गत अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे, असे महावितरणने सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील १.५४ लाख, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या.

एक किलोवॅटच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 05/Nov/2025